लोकेशन...सिंहगड व्हॅली


व्हर्डिटर फ्लायकॅचर
     प
हाट झाली, भैरू उठला. कॅमेरा, लेन्स, ट्रायपॉडची जुळणी केली आणि स्वयंचलित दुचाकीवर टांग मारून ४० च्या वेगानं भरधाव निघाला. झुंजूमुंजू होण्यापूर्वी त्याला मोक्याची जागा पकडायची होती. मिळेत ते शॉर्टकट घेत त्याचं वाहनरुपी वारू महामार्ग, कच्चे-पक्के रस्ते, खाच-खळगे पार करत चौखूर धावू लागलं. कितीही घाई केली, तरी भैरूला पोचायला ३५ मिनिटं लागलीच. योग्य ठिकाणी जाऊन मोक्याची जागा पकडण्यासाठी त्याची सारी धडपड व्यर्थ गेली...कारण
     ...कारण? सर्वांत आधी पोचण्यासाठी लवकर उठावं लागतं आणि स्नानाला बुट्टी मारून थेट जागा धरण्यासाठी पळावं लागतं, हे केवळ त्यालाच नाही, तर सर्वांनाच माहित असतं. त्याच्याआधीच ५-७ जण पूर्ण तयारीनिशी 'फ्रेमी'त एखादा पक्षी गावण्याची वाट पाहात बसले होते. म्हणजे कल्लाच की हो...! इतक्या पहाटे येण्याची कारणं दोन. पहिलं म्हणजे अर्थातच जागा धरणं आणि दुसरं म्हणजे इतर कुणी येण्याआधीच एखादा वेगळा पक्षी गावलाच, तर सोनेपे सुहागा! वेगळा पक्षी गावणं सोनेपे सुहागा असलं, तरी पहाटेच्या अंधुक उजेडात 'आयएसओ' वाढवूनच फोटू घ्यावा लागतो. नंतर त्यावर फोटोशॉप नाहीतर लाईटरूममध्ये जीव तोडून मेहनत घ्यावी लागते.
     
ब्लॅक लोअर्ड यलो टिट
तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपला भैरू पहाटेच्या अंधारात आला खरा, पण मोक्याची जागा नसल्याचं पाहून हिरमुसला. ठिकाणाचा भूगोलच असा, की कोणाच्या नाकावर टिच्चून नवी जागा शोधणंही अवघड. तशी जागा सापडली, तरी तिथं कमरेइतकं उंच गवत किंवा झुडुपं. ओढ्यात जागा अपुरी. मध्येच फतकल मारून बसताही येत नाही. तसा प्रयत्न जरी केला, तर बोलत कोणीच नाही, पण सर्वांच्या नजरा अशा असतात, की उठण्यावाचून पर्यायच नसावा. आता भैरूला एकतर तिवईवर (ट्रायपॉड) कॅमेरा ठेवून उभं राहावं लागणार होतं, किंवा फिरस्ता. पण बसल्याजागी फोटू काढण्याच्या आशेनं, भैरू उभं राहणंच पसंत करतो.
     
ब्लॅक नेप्ड मोनार्क
यावरून एखाद्या शेंबड्या पोराच्याही लक्षात येणारी गोष्ट तुमच्याही लक्षात आलीच असेल. लोकेशन! पक्ष्यांचे फोटू घेण्यासाठी चांगली जागा किंवा लोकेशन हवंच. गभस्तीची दिशा पाहून त्याच्याकडे पाठ करून बसावं लागतं. पाठ चांगली शेकली, तरी जागा सोडायची नसते. सर्वजण आतुरतेनं वाट पाहात असतात, ती सूर्योदयाची. जागा पकडून बसलेले सर्वचजण ओढ्याच्या पूर्वेला बसलेले असतात. पश्चिमेकडे कुणीच नसतं. बसूनही काही फायदा नसतो म्हणा. कारण 'फ्रेमी'त अडकलेली चित्रं पांढुरकी होण्याची भीती असते. तर आपला भैरूही सूर्याकडे पाठ करूनच वाट पाहात होता, सूर्योदयाची!
     
अॅशी प्रीनिया
चाणाक्षांच्या लक्षात हे कोणतं लोकेशन हे लगेच लक्षात आलं असेल. अगदी बरोबर. सिंहगड़ व्हॅली! स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचं एक प्रमुख ठिकाण. शिवाय पुण्याजवळचं. फारसं लांब न जाताही विविध प्रकारचे पक्षी इथं येतात. कशासाठी येतात?  अहो पाणी प्यायला आणि आंघोळीलाही. या परिसराला नियमित भेट देणाऱ्या पक्ष्यांमध्ये असतात स्कॅली ब्रेस्टेड मुनिया, व्हाईट रम्प्ड मुनिया, इंडियन सिल्हरबिल, ओरिएंटल व्हाईट आय, इंडियन रॉबिन, रेड थ्रोटेड फ्लायकॅचर, ओरिएंटल मॅगपाय रॉबिन, लिटल स्पायडरहंटर, रेड व्हेंटेड बुलबुल, रेड व्हिस्कर्ड बुलबुल, अॅशी प्रीनिया, ब्लॅक लोअर्ड यलो टिट, ग्रेट टिट, रूफस ट्रीपाय, प्लम हेडेड पॅराकीट, व्हाईट ब्रेस्टेड फॅनटेल, लाँग टेल्ड श्राईक, लिटल ग्रीन बी-ईटर, यलो थ्रोटेड पेट्रोनिया, लिटल ब्राऊन डव्ह, स्पॉटेड डव्ह हे नेहमीचे पक्षी.
     नेहमीच्या पक्ष्यांमध्ये सर्वांत जास्त आकर्षण असतं, ते पॅराडाईज फ्लायकॅचरचं. हा लाजाळू पक्षी आपल्या लांब पांढऱ्याशुभ्र शेपटीचा पिसारा सांभाळत तोऱ्यात येतो. त्याचं आगमन झाल्याच्या खाणाखुणा झाल्यानंतर सर्वजण सज्ज होतात. त्याच्यानंतर येते ती पॅराडाईज फ्लायकॅचरची विटकरी रंगाची पण नरासारखाच डोक्यावर मोरपंखी तुरा मिरवणारी त्याची मादी. ती मात्र निर्धास्तपणे डोक्यावरून उडत फुलपाखरं टिपत असते. शिवाय हिवाळ्यात व्हर्डिटर फ्लायकॅचर, ब्लॅक नेप्ड मोनार्क, ग्रीनिश वार्बलर, ग्रे हेडेड कॅनरी फ्लायकॅचर, स्थानिक असला, तरी क्वचित दिसणारा गोल्ड फ्रंटेड लीफबर्ड, ग्रे ब्रेस्टेड प्रीनिया अशा मंडळींसाठी सर्वचजण आसुसलेले असतात. परिसरात शिकार करणारे बोनेलीज ईगल, परिसरातच राहणारे चेंजेबल हॉक ईगल, शिक्रा हे पक्षी अधूनमधून या ठिकाणाला भेट देत असतात. काही लोक वारंवार इथं येत असतात. गेल्या वेळी व्हर्डिटर फ्लायकॅचर चांगला मिळाला नाही. आज मिळाला तर पाहू, या आशेनं येतात, तर नवोदित कॅमेऱ्यातील वेगवेगळी सेटिंग्ज तपासून पाहण्यासाठी येत असतात.    
   
गोल्ड फ्रंटेड लीफबर्ड
     भैरूला काही चांगली जागा मिळू शकली नसली, तरी तो चांगले फोटू घेऊ शकणार होता. तो उभा असलेलं ठिकाणही तसं आदर्श होतं. पाण्यात डुंबणारे पक्षी फार चांगले मिळणार नसले, तरी पाण्याकडे झेप घेण्यापूर्वी झाडांच्या फांद्यांवर बसलेले असताना त्याला ते चांगले मिळणार होते. शिवाय ते फोटो इतरांपेक्षा वेगळे असणार होते. भैरू खूष होता, कारण पक्षी त्याला सर्वांत आधी दिसत होते.
     सिंहगड व्हॅली ही एक जागा झाली. पुण्याजवळ अशा अनेक जागा आहेत. पाषाण लेक हा त्यापैकीच एक. इथं प्रामुख्यानं दिसतात ते पाणपक्षी. सनबर्डचाही इथं वावर असतो. हिवाळ्यात खडकवासला धरणाच्या पसरलेल्या पाण्यात काही जातीचे बदक येतात. त्यांना पकडण्यासाठी क्वचित स्टेपी किंवा अन्य गरुडही दिसतो. पाणपक्ष्यांसाठी आणखी एक जवळचं ठिकाण म्हणजे कवडी. कवडी-पाट नावानं ते प्रसिद्ध आहे. सोलापूर रस्त्यावरील टोलनाक्याच्या थोडं पुढं गेल्यानंतर डावीकडे वळून तिथं जाता येतं. शिकारी पक्ष्यांसाठी सासवड परिसर प्रसिद्ध आहे. उघडं माळरान असल्यामुळं कॅमेऱ्यात त्यांना टिपणंही सोयीचं असतं. भैरूचा या सर्वच ठिकाणी मुक्त संचार असतो. पण पुणे आणि परिसराची अद्वातद्वा वाढ झाल्यामुळं पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत चाललाय. जिकडं पाहावं तिकडं काँक्रीटच्या इमारती दिसताहेत. निसर्गाचा पार बट्ट्याबोळ झालाय.
   
स्कॅली ब्रेस्टेड मुनिया
     सूर्य आता डोक्यावर आला होता. ओढ्यात नसला, तरी भैरूच्या पोटात कावळे कावकावाट करू लागले. पक्ष्यांच्या विश्रांतीची वेळ चालू झाली होती. चार वाजेपर्यंत थांबावं की घरी जावं या विचारात भैरू असतानाच ओढ्यातल्या दोघा-तिघांनी डबे काढले आणि अल्पोपहार सुरू केला. ते पाहून तर पोटातले कावळे थयथयाट करू लागले. भैरूनं निमूटपणे कॅमेरा आवरला आणि घराची वाट धरली.

Comments

  1. हा भैरु लवकर तर ऊठतोच पण रात्रीही जगावतो. मात्र त्याची नजर खुप छान आहे. त्यांच्या दृष्टीला जे दिसते ते खरोखरच सुंदर असते. असेच तुमच्या भैरूला लवकर ऊठून टेकडीवर , किल्ल्यावर पाठवा. आम्हाला ते सारे पाहायला अनुभवायला मिळेल. अभिनंदन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशाच एका 'रम्य' सकाळी...

विहंगभूमी नैनिताल